जळगाव दि 17 (जिमाका) – जळगाव जिल्हयात सध्या कोरोना नियंत्रणात असला तरी ओमायक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्ह्यातील लसीकरणाला अधिकाधिक गती द्यावी, घरोघरी (Door To Door ) जाऊन लसीकरण मोहीम पूर्ण करावी, कोरोनाच्या संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
जळगाव जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या कामकाजाचा आणि कोरोना विषाणू प्रादुर्भाव आणि उपाययोजनांची आढावा बैठक येथील नियोजन भवनात आयोजित केली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील, खासदार रक्षाताई खडसे, महापौर जयश्री महाजन, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे, महापालिका आयुक्त सतिष कुलकर्णी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले की, जिल्ह्यात अधिकाधिक विकासकामे होण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्मयातून संपूर्ण निधी उपलब्ध करुन दिलेला आहे. या निधीच्या माध्यमातून कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणाला प्राधान्य द्यावे. कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून रुग्णालयांचे फायर, स्ट्रक्चरल आणि इलेक्ट्रीकल ऑडीट करावे. दुसऱ्या टप्प्यातील सर्वोच्च ऑक्सिजन मागणीच्या तिप्पट ऑक्सिजनच्या उपलब्धतेचे नियेाजन करावे, मास्क वापरण्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करावी. कोविड काळात सेवा देणाऱ्या कोणत्याही यंत्रणांचे देयक थकीत ठेवू नये यासाठी निधीची उपलब्धता करुन देण्यात येईल. विविध विकास कामांत कंपन्याकडून सामाजिक दायित्व निधी (CSR) मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याच बरोबर कृषि, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा उभारण्यासाठी निधी खर्च करावा. पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन तोडू नये. शहराच्या रस्त्यांसाठी देण्यात आलेला निधी खर्च करुन दर्जेदार रस्ते तयार करावेत. जिल्हा वाषिक योजनेच्या माध्यमातून महसूल तसेच पोलिस यंत्रणांच्या तालुकास्तरीय कार्यालयांना वाहने उपलब्ध करुन देण्यात येतील.
यावेळी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेचे व शाळांना संरक्षणभिंतीच्या कामांचे त्याचबरोबर जिल्ह्यात अनुसूचति जाती उपयोजनेतंर्गत खर्चाचे प्रमाण अधिक असल्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी कौतूक केले.
कोविड काळात आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी दिलेला निधी खर्च करण्यात आला असून यावर्षी जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत प्राप्त झालेल्या निधीच्या खर्चाचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर लसीकरणाची गती वाढविण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. जिल्हा नियोजन समितीच्या खर्चाची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी तर कोविडबाबतच्या उपाययोजनांचे सादरीकरण जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन. एस. चव्हाण यांनी केले.
या बैठकीस आमदार सर्वश्री संजय सावकारे, शिरीष चौधरी, किशोर पाटील, सुरेश भोळे, चंदक्रांत पाटील, मंगेश चव्हाण, श्रीमती लताताई सोनवणे यांच्यासह सर्व कार्यान्वयीन यंत्रणांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.