जळगाव, (प्रतिनिधी) : बांबू लागवड योजनेच्या फाईल मंजूर करण्यासाठी ३६,००० रुपयांची लाच घेताना वन विभागाच्या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. या कारवाईत एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार शेतकरी असून त्यांना आणि त्यांच्या तीन नातेवाईकांना शेतात बांबू लागवड करायची होती. यासाठी त्यांनी अमृत महोत्सवी फळझाड/वृक्ष लागवड योजनेअंतर्गत चार फाईल सामाजिक वनीकरण विभाग, अमळनेर येथे दाखल केल्या होत्या. या विभागाचा अतिरिक्त कार्यभार पारोळा येथील वन परिक्षेत्र अधिकारी मनोज बबनराव कापूरे यांच्याकडे होता. तक्रारदाराने कापूरे यांची भेट घेतली असता, त्यांनी प्रत्येक फाईलसाठी १०,००० रुपये, अशा एकूण ४०,००० रुपयांची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली.
दरम्यान एसीबीने सापळा रचून केलेल्या पडताळणीमध्ये, आरोपी मनोज कापूरे आणि लिपिक निलेश चांदणे यांनी ३६,००० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. ही रक्कम कंत्राटी कर्मचारी कैलास भरत पाटील यांच्याकडे देण्यास सांगितले होते. ठरल्याप्रमाणे, पाटील यांनी पंचांसमक्ष ३६,००० रुपयांची लाच स्वीकारली. या कारवाईनंतर एसीबीने तिन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत नागरे करत आहेत.








