चाळीसगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यात अवैध शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणाऱ्यांवर मेहुणबारे पोलिसांनी कारवाई केली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी उंबरखेड गावातून दोघांना अटक करून त्यांच्याकडून धारदार तलवार आणि कुकरी जप्त केली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मेहुणबारे पोलिसांना अशी माहिती मिळाली होती की, उंबरखेड गावातील दोन तरुण अवैध शस्त्र बाळगून परिसरात दहशत निर्माण करत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत छापा टाकला. त्यावेळी सुकलाल सुरेश सोनवणे आणि किरण यशवंत सोनवणे हे दोघे त्यांच्याजवळ विनापरवाना धारदार शस्त्रे बाळगताना आढळले.
पोलिसांनी त्यांच्याकडून एक धारदार लोखंडी तलवार आणि एक धारदार लोखंडी कुकरी जप्त केली. दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मेहुणबारे पोलीस करत आहेत. सदरची कामगिरी प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे, पोलीस उप-निरीक्षक सुहास आव्हाड, पोलीस उप-निरीक्षक विकास शिरोळे, पोहेकॉ मोहन सोनवणे, कुशल शिंपी, बाबासाहेब पगारे, पोकों विनोद बेलदार, भूषण बाविस्कर आणि चापोकों ईश्वर देशमुख यांच्या पथकाने पार पाडली आहे.