चाळीसगाव, (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गिरणा धरण ६५% भरले आहे. शनिवार, २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत धरणात एकूण ६५% जलसाठा जमा झाला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी गिरणा धरणात केवळ २१% पाणीसाठा शिल्लक होता. मात्र, आता नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाल्याने धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आतापर्यंतच्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात एकूण ४४% वाढ झाली आहे.
गिरणा पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पुढील आठवड्यात धरणातील पाणीसाठा ८०% पर्यंत पोहोचेल. यामुळे नदीकाठच्या गावांना आणि शेतीत सिंचनासाठी मोठा दिलासा मिळाला आहे.