रावेर, (प्रतिनिधी) : रावेर पोलिसांनी अपहृत एका अल्पवयीन मुलीचा सोलापूर जिल्ह्यातून यशस्वीरित्या शोध लावला असून, तिला पळवून नेणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. मुलीला तिच्या पालकांच्या सुखरूप स्वाधीन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील केऱ्हाळा येथून रुमा पुन्या भिलाला यांनी रावेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की, एका अज्ञात इसमाने त्यांच्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते (जळगाव), उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप (चोपडा) आणि अतिरिक्त कार्यभार फैजपूर विभाग पो.नि. डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला.
गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती, नातेवाईकांची चौकशी आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी अपहृत मुलीचा माग काढला. संशयित आरोपी राज्या उर्फ सोन्या बारेला (रा. केऱ्हाळा बु., ता. रावेर) हा सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे असल्याची माहिती मिळाली. रावेर पोलिसांच्या पथकाने अत्यंत शिताफीने अकलूज येथे जाऊन राज्या उर्फ सोन्या बारेला याला ताब्यात घेतले. त्याच्यासोबत अपहृत मुलीलाही सुखरूप ताब्यात घेऊन रावेर येथे आणण्यात आले.
पोलिसांनी मुलीला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले असून, तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करत आहेत. पो.हे.कॉ. विष्णू भिल, पो.कॉ. सचिन घुगे, पो.कॉ. नितीन सपकाळे आणि म.पो.कॉ. उज्वला पवार यांच्या पथकाने या कामगिरीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.