जळगाव, (प्रतिनिधी) : गेल्या सात महिन्यांपासून धरणगाव रोड रॉबरी प्रकरणात फरारी असलेला मुख्य आरोपी अभिजीत भरतसिंग राजपूत (वय २७, रा. मळाणे, वणी, जि. धुळे) याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. हा आरोपी गुन्हा घडल्यापासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होता.
धरणगाव पोलिस स्टेशनमध्ये १६ डिसेंबर २०२४ रोजी दाखल झालेल्या रोड रॉबरी गुन्हे प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोहवा संदीप पाटील आणि प्रविण मांडोळे करत होते. मिळालेल्या गोपनीय माहिती आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे, हा गुन्हा अभिजीत राजपूत, अक्षय उर्फ घोडा पाटील, संभाजी पाटील आणि अजय थोरात यांनी संगनमत करून केल्याचे निष्पन्न झाले होते. यापैकी अक्षय उर्फ घोडा भीमराव पाटील याला यापूर्वीच ५ फेब्रुवारी २०२५ रोजी अटक करण्यात आली होती, परंतु अभिजीत राजपूत आणि त्याचे अन्य साथीदार फरार होते.
गुन्हा घडल्यापासून अभिजीत राजपूत पोलिसांना गुंगारा देत होता. त्याला पकडण्यासाठी धरणगाव पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेची पथके सतत शोध घेत होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, पोहवा संदीप पाटील, हरीलाल पाटील, प्रविण मांडोळे, पोशि राहुल कोळी, मपोशि दर्शना पाटील, चापोशि महेश सोमवंशी यांच्या विशेष पथकाने या आरोपीचा शोध सुरू ठेवला.
२६ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अभिजीत राजपूत त्याच्या मूळगावी, मळाणे (वणी), धुळे येथे आल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने तात्काळ सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच अभिजीतने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याला संधी न देता मोठ्या कौशल्याने ताब्यात घेतले आणि अटक केली.
चौकशीदरम्यान, अभिजीत राजपूतने अमळनेर पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्हा त्याच्या साथीदारांसोबत केल्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला पुढील तपासासाठी अमळनेर पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. अन्य दोन फरारी आरोपींचा पोलिस अजूनही शोध घेत आहेत. अभिजीत राजपूतच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपास केला असता, त्याच्यावर यापूर्वीही विविध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
ही यशस्वी कारवाई जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक (चाळीसगाव परीमंडळ) कविता नेरकर, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी (अमळनेर भाग) विनायक कोते आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईमुळे जिल्ह्यातील रोड रॉबरी सारख्या गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.