जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्यात लम्पी स्किन (कातडी सदृश) आजाराचा प्रादुर्भाव २३ ठिकाणी आढळून आल्याने जिल्हा प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आले आहे. या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत युद्धपातळीवर लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. पशुपालकांनी घाबरून न जाता, सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मिनल करनवाल यांनी केले आहे.
बुधवारक २३ जुलै रोजी सीईओ मिनल करनवाल यांनी पारोळा आणि एरंडोल तालुक्यातील गावांना भेट देऊन लसीकरण मोहिमेची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक पशुपालकांशी संवाद साधून लम्पी आजाराबाबत आवश्यक मार्गदर्शन केले. या प्रसंगी पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रदीप झोड हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १६६ जनावरे लम्पीने बाधित झाली आहेत, त्यापैकी ५० जनावरे पूर्णपणे बरी झाली आहेत. सद्यस्थितीत ६६ जनावरे बाधित असून, ६ जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाने लसीकरणावर विशेष भर देत सतत निरीक्षण आणि नियंत्रण उपाययोजना सुरू केल्या आहेत.
सीईओ मिनल करनवाल यांनी स्पष्ट केले की, लम्पी आजार हा संसर्गजन्य नाही आणि त्याची माणसांमध्ये कोणतीही लागण होत नाही. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. दूध उकळून प्यावे आणि कोणताही संभ्रम बाळगू नये, असे आवाहन त्यांनी केले. प्रशासनामार्फत जनजागृती, लसीकरण आणि उपचार मोहिमांना वेग देण्यात येत असून, पशुपालकांनी प्रशासनाशी सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.