चोपडा, (प्रतिनिधी) : काळवीटाची शिकार करून त्याचे मांस आणि शिंगे वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना चोपडा ग्रामीण पोलिसांनी आज यशस्वीरीत्या जेरबंद केले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून, वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत पुढील कारवाई वन विभागामार्फत केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार राकेश तांकू पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल गजानन मच्छिंद्र पाटील यांना एका गोपनीय माहिती मिळाली की, वांगऱ्या बारेला (रा. टाक्यापाणी, वरला) आणि त्याचा साथीदार मोटारसायकल (एमपी १० एनसी ४८५७) वरून वैजापूर आणि परिसरात हरणाचे मांस विक्रीसाठी येणार आहेत. सदर माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब घोलप (चोपडा उपविभाग) त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाहीचे नियोजन करण्यात आले.
वन्यप्राण्याच्या तस्करीशी संबंधित असल्याने, ही माहिती तात्काळ वन विभागाला देण्यात आली. त्यानंतर, पोलीस निरीक्षक अनिल भवारी, सपोनि राजू महाजन, पोहेकॉ राकेश पाटील, पोकॉ गजानन पाटील, पोकॉ विनोद पवार, पोकॉ चेतन महाजन, पोकॉ सुनील कोळी आणि वन विभागाचे आरएफओ विकेश ठाकरे, वनपाल सारिका कदम, वनरक्षक बी.आर. बारेला, वनरक्षक बानू बारेला, वनरक्षक योगेश सोनवणे यांच्या पथकाने वन कंपार्टमेंट २३६ बोरअजंटी ते वैजापूर रस्त्यावर नाकाबंदी केली.
दरम्यान दोन इसम मोटारसायकल (एमपी १० एनसी ४८५७) वरून चोपड्याकडून वैजापूरकडे जाताना दिसले. त्यांच्या दुचाकीवर प्लास्टिकच्या गोणीत काळवीटाची (हरणाची) दोन शिंगे आणि मांस आढळून आले. याप्रकरणी संशयित वांगऱ्या फुसल्या बारेला (वय ४८, रा. टाक्यापाणी, ता. वरला, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) आणि धुरसिंग वलका बारेला (वय ४५ वर्षे, रा. बरुड, ता. जि. खरगोन, मध्य प्रदेश) यादोघांना ताब्यात घेतले असून आरोपींविरुद्ध वन विभागामार्फत पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. चोपडा ग्रामीण पोलिसांच्या या कामगिरीमुळे वन्यजीव संरक्षणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.