जळगाव, (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्ट वैद्यकीय सेवेचा प्रत्यय दिला आहे. २५ वर्षीय सपना राठोड या विवाहितेने यशस्वी सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे एकाच वेळी तीन गोंडस बाळांना जन्म दिला आहे. मातेसह तिन्ही बाळे सुखरूप असून, ही कामगिरी रुग्णालयाच्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाच्या वैद्यकीय पथकाने केली आहे. या यशाबद्दल अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी संपूर्ण पथकाचे विशेष कौतुक केले आहे.
प्रसूतीसाठी सपना राठोड यांना स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात दाखल करण्यात आले होते. तपासणीदरम्यान त्यांच्या पोटात तीन बाळे असल्याचे निदान झाले. यानंतर, वैद्यकीय पथकाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सिझेरियन शस्त्रक्रिया यशस्वी करून तिन्ही बाळांना सुखरूप जन्माला घातले.
वैद्यकीय पथकाची चमकदार कामगिरी..
या यशस्वी शस्त्रक्रियेचे नेतृत्व स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाचे पथक प्रमुख डॉ. राहुल कातकाडे यांनी केले. त्यांना सहाय्यक प्राध्यापक डॉ. सूरज कोठावदे आणि वरिष्ठ निवासी डॉक्टर डॉ. श्रद्धा चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच, कनिष्ठ निवासी डॉक्टर्स डॉ. माधुरी उदगिरे, डॉ. चंद्रकांत बर्गे, डॉ. श्रेष्ठा शुक्ला, डॉ. श्रीहरी बिरादार व डॉ. मिताली इंगळे यांनी सक्रिय सहभाग घेतला. भूलतज्ञ विभागानेही या शस्त्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली. भूलतज्ञ विभागाचे प्रमुख डॉ. अमित हिवरकर, प्राध्यापक डॉ. अंजू पॉल, वरिष्ठ निवासी डॉ. ऐश्वर्या मोने आणि कनिष्ठ निवासी डॉ. तासीन सीदा यांनी उत्तम सहकार्य केले.
बाळे सुदृढ आणि निरोगी
जन्माला आलेल्या तिन्ही नवजात बाळांचे वजन अनुक्रमे १.६ किलो, १.९ किलो आणि २.० किलो असून, सर्व बाळे ठणठणीत व निरोगी असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. सध्या त्यांना नवजात शिशु अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असल्याचे डॉ. राहुल कातकाडे यांनी सांगितले. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील, अधिसेविका संगीता शिंदे व रुग्णालयातील संपूर्ण वैद्यकीय पथकाने समाधान व्यक्त केले आहे.