जळगाव, (प्रतिनिधी) : शहरात गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी एक लाख रुपये किमतीची सोनपोत लंपास केली, तर दुसऱ्या एका व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून १५ हजार रुपये लुटले. या घटनांमुळे जळगावातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
निवृत्ती नगरात १४ जुलै रोजी रात्री ८:३० च्या सुमारास किराणा दुकानात खरेदी करत असताना महिलेची एक लाख रुपये किमतीची सोनपोत लंपास करण्यात आली. प्रमिला पुंडलिक पाटील (वय ६०) यांनी १५ जुलै रोजी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पाटील यांच्या घराला लागूनच असलेल्या किराणा दुकानात त्या थांबल्या असताना, दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी चहा मसाल्याची पुडी घेतली. प्रमिला पाटील पैसे परत देण्यासाठी खाली वाकल्या असता, त्यांच्या गळ्यातील सोनपोत ओढून चोरट्यांनी पळ काढला. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस तपास करत आहेत.
दुसरी घटना १२ जुलै रोजी रात्री अजिंठा चौफुली परिसरात घडली. कांद्याचे व्यापारी सय्यद फैय्याज गयासुद्दीन हे सुप्रीम कॉलनीकडे पायी जात असताना, एका बेकरीजवळ अमन खेकडा नावाच्या व्यक्तीने त्यांना अडवले. चाकूचा धाक दाखवून अमन खेकडाने सय्यद फैय्याज यांच्याकडून १५ हजार रुपये लुटले. याप्रकरणी सय्यद फैय्याज यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, अमन खेकडाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे करत आहेत.