जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील आर.आर. विद्यालयात शुक्रवारी (११ जुलै) दुपारी कल्पेश वाल्मीक इंगळे (वय १५, रा. कासमवाडी) या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. शाळेने दिलेल्या माहितीनुसार, कल्पेशला चक्कर येऊन तो मैदानावर कोसळला, तर त्याच्या नातेवाईकांनी त्याला इतर विद्यार्थ्यांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.
ही घटना दुपारी तीन वाजता शाळेतील मधल्या सुटीदरम्यान घडली. शाळेच्या म्हणण्यानुसार, खेळता खेळता कल्पेश अचानक जमिनीवर पडला. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दुसरीकडे, कल्पेशची आजी वत्सला सोनवणे यांनी ही बाब फेटाळली आहे. “त्याच्या कपड्यावर मातीचा एकही डाग नाही. त्याला चक्कर आली नसून, मारहाण झाल्यामुळेच त्याचा मृत्यू झाला आहे,” असे त्यांनी सांगितले. नातेवाईकांनी दोन दिवसांपूर्वीही शाळेत कल्पेशचा वाद झाला होता, अशी माहिती दिली आहे.
या घटनेच्या वेळी शाळेत जिल्हा परिषदेची चौकशी समिती उपस्थित होती. मुख्याध्यापक योगेश चौधरी यांनी नातेवाईकांच्या मागणीनुसार सीसीटीव्ही फुटेज तपासले, परंतु त्यात घटनास्थळ स्पष्ट दिसत नसल्याचे सांगितले. पुढील तपास सुरू आहे.