जळगाव, (प्रतिनिधी) : वाढत्या लोकसंख्येच्या गंभीर परिणामांबाबत समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि कुटुंब कल्याणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जिल्ह्यात जागतिक लोकसंख्या दिन (११ जुलै) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने या निमित्ताने विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावर्षीच्या जागतिक लोकसंख्या दिनाची थीम “People, Planet, Possibilities” ही होती, तर घोषवाक्य “आई होण्यासाठी योग्य वय तेव्हा, शरीर व मनाची तयारी जेव्हा” असे होते.
या उपक्रमांचा मुख्य उद्देश शाश्वत विकासासाठी संतुलित लोकसंख्या वाढीची आवश्यकता अधोरेखित करणे हा आहे. आरोग्य विभागाने यासाठी ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये (पीएचसी) कुटुंब नियोजन शिबिरे आयोजित केली. तसेच, महिला व किशोर गटासाठी आरोग्य संवाद, पोस्टर-बॅनरद्वारे प्रसिद्धी रॅली आणि शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. यावेळी नागरिकांना आरोग्य विभागाने राबविलेल्या कुटुंब कल्याण व आरोग्य उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहनही करण्यात आले.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव..
कार्यक्रमादरम्यान कुटुंब कल्याण शस्त्रक्रियांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुका आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. यामध्ये, सर्वाधिक कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अडावद, वाकोद आणि वाकडी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच, कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये खिरोदा, वैजापूर आणि धामणगाव यांनाही गौरवण्यात आले. सर्वात जास्त कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करणारे तालुके म्हणून चोपडा आणि पारोळा यांना सन्मानित करण्यात आले.