अमळनेर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील पाडळसरे येथे एका तरुण शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी घडली. सोपान महारू कोळी (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मारवड पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
सोपान कोळी हे पाडळसरे येथे पत्नी आणि मुलांसोबत शेती करून उदरनिर्वाह करत होते. बुधवारी सकाळी त्यांची पत्नी नेहमीप्रमाणे कामावर निघून गेली. त्यानंतर सोपान हे घराच्या दुसऱ्या मजल्यावर एकटेच होते. दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी झोक्याच्या दोरीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पारधी या घटनेचा पुढील तपास करत आहेत.