जळगाव, (प्रतिनिधी) : महावितरणच्या जळगाव विभागीय कार्यालयासमोर प्रलंबित बदल्यांच्या विरोधात कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. कामगार महासंघाने ८ जुलैपासून साखळी उपोषण पुकारले असून, दोन कर्मचाऱ्यांनी तर अन्नत्याग आंदोलनाला प्रारंभ केला आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
मुख्य कार्यालयाच्या परिपत्रकानुसार १५% बदल्या करण्याचे आदेश असतानाही आणि ही टक्केवारी शिल्लक असतानाही कामगारांच्या बदल्या करण्यात आल्या नसल्याने त्यांना अखेर आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला आहे. कामगार संघटनेने या उपोषणाला पूर्ण पाठिंबा दर्शवला असून, हे आंदोलन संघटनेच्याच नेतृत्वाखाली होत असल्याचे स्पष्ट केले आहे.
कामगारांना त्वरित न्याय न मिळाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. तसेच, या आंदोलनामुळे औद्योगिक शांतता भंग झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल, असेही त्यांनी म्हटले आहे. कामगारांच्या हक्कांसाठी आणि प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे, असे कामगार महासंघाने सांगितले.
मंगळवारी वरिष्ठ तंत्रज्ञ विकी पाटील आणि तंत्रज्ञ सुदर्शन सपकाळे यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले असून, महासंघाने त्यांना साखळी उपोषणाद्वारे पाठिंबा दिला आहे. येत्या काळात हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे.