जळगाव, (प्रतिनिधी) : महिला सक्षमीकरण आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक मैलाचा दगड ठरलेल्या ऐतिहासिक उपक्रमात चोपडा शहराच्या योगिताताई या पहिल्या महिला पिंक ऑटो रिक्षा चालक-मालक बनल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांच्या हस्ते त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पिंक रिक्षा प्रदान करण्यात आली. या स्तुत्य उपक्रमासाठी रोटरी क्लब जळगाव आणि मराठी प्रतिष्ठान यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
मराठी प्रतिष्ठानतर्फे गेल्या पाच वर्षांपासून हा अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे, जो महिला सबलीकरण आणि उद्यमशीलतेचे उत्तम उदाहरण आहे. महिलांना पिंक रिक्षा चालवण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देणे, उद्योजक आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने डाऊन पेमेंट उपलब्ध करून देणे, आणि महिलांना रिक्षा मालक बनवणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
आजवर २२ महिलांनी जळगाव शहरात पिंक रिक्षा चालक-मालक होण्याचा मान मिळवला आहे, तर ग्रामीण भागातून ही संधी मिळवणाऱ्या योगिताताई या पहिल्याच महिला ठरल्या आहेत. त्यांची जिद्द, आत्मविश्वास आणि संघर्ष इतर महिलांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी योगिताताईंचे विशेष कौतुक करत म्हटले की, “ही केवळ रिक्षा नसून, महिलांच्या सक्षम भविष्यासाठी चाललेल्या एका चळवळीचे वाहन आहे. महिलांनी पुढे येऊन समाजात आपले स्थान निर्माण करावे हीच अपेक्षा.”
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये आर्थिक स्वावलंबनाची नवी आशा निर्माण झाली असून, मराठी प्रतिष्ठान आणि रोटरी क्लब जळगाव यांनी समाजाप्रती दाखवलेली सामाजिक बांधिलकी खरोखरच उल्लेखनीय आहे. या प्रसंगी मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी जिल्हाधिकारी जळगाव आणि रोटरी क्लब जळगाव यांचे आभार मानले.
या प्रसंगी रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष अॅड. सागर चित्रे, पराग अग्रवाल, माजी अध्यक्ष जितेंद्र ढाके, माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. चंद्रशेखर सिकची, रितेश जैन, प्रमोद नारखेडे, माजी अध्यक्ष डॉ. शशिकांत गाजरे, जयवर्धन नेवे, सुभाष अमळनेरकर, उद्योजक सुबोध चौधरी, डॉ. सृष्टी सुमोल चौधरी, अश्विन राणे, मराठी प्रतिष्ठानच्या डॉ. सविता नंदनवार, निलोफर देशपांडे, हर्षाली चौधरी, खुशबू जुबेर देशपांडे, संदीप पाटील यांची उपस्थिती होती.