जळगाव, (प्रतिनिधी) : प्रत्येक मुलामध्ये एक उपजत कलाकार दडलेला असतो आणि त्यांच्यातील सर्जनशीलतेला योग्य व्यासपीठ मिळाल्यास खरी कला जन्माला येते, असे प्रतिपादन केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर यांनी केले. रिंगरोड वरील आर्ट गॅलरीमध्ये चित्रकार सचिन मुसळे यांच्या ४५ विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या ‘मोरपिसारा’ या चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या प्रदर्शनात ‘मोर’ या एकाच संकल्पनेवर आधारित विविध शैलीतील आणि माध्यमांतून साकारलेली चित्रे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहेत. कार्यक्रमाचा प्रारंभ विठ्ठल-रुक्मिणीचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाला. जळगाव पीपल्स बँकेचे माजी अध्यक्ष भालचंद्र पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन झाले. यावेळी बोलताना भालचंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे कौतुक केले आणि चित्रकलेसाठी लागणाऱ्या मूळ रंगांच्या निर्मितीमध्ये आपण अनेक वर्षांपासून कार्यरत असल्याचे सांगितले. “कलेप्रती प्रेम जपणे आणि आपल्यातील चित्रकाराला जोपासणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे कर्तव्य आहे,” असे ते म्हणाले.
उद्योजक किरण बच्छाव यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, “कोणतेही शहर सुंदर होण्यासाठी तिथे कलावंतांची गरज असते. सचिन मुसळे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून जळगाव शहराचे सौंदर्य अधिकच खुलवले आहे.”
प्रदर्शनातील विविध चित्रांव्यतिरिक्त, १५ विद्यार्थ्यांनी १५ दिवसांत टाकाऊ पुठ्ठ्यांपासून साकारलेले भव्य ‘मोरा’चे इन्स्टॉलेशन हे उपस्थितांचे मुख्य आकर्षण ठरले. चित्रकार सचिन मुसळे यांनी आभार प्रदर्शनात सांगितले की, या प्रदर्शनात ५ ते ६३ वयोगटातील कलाकारांनी सहभाग घेतला असून, त्यांनी एकाच विषयावर अनेक दिवसांपासून परिश्रमपूर्वक काम केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले. या प्रदर्शनाला चित्रप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
‘मोरपिसारा’ हे चित्रप्रदर्शन १५ जुलैपर्यंत सुरू राहणार असून, चित्रप्रेमींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.