जळगाव, (प्रतिनिधी) : पर्यावरणाचे महत्त्व आणि स्थानिक बियाण्यांचे संरक्षण याविषयी विद्यार्थी व पालकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयाने एक अनोखा आणि स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. संस्थाचालक आणि माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या संकल्पनेतून, ‘शैक्षणिक फी न घेता देशी बियाणे’ जमा करणाऱ्या विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत हा पर्यावरणपूरक निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या इको क्लबमार्फत चालवण्यात येणाऱ्या सीड बँकेत (बियाणे बँक) देशी बियाणे जमा केल्यास, त्यांच्या शैक्षणिक शुल्कात सवलत दिली जाईल. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरणाबद्दल थेट कृती करण्याची संधी मिळणार आहे, तसेच त्यांना बियाण्यांच्या संरक्षणाचे महत्त्वही समजेल.
संस्थाचालक प्रशांत नाईक यांनी या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “सीड बँकेतून पैसे मिळवणे हा आमचा उद्देश अजिबात नाही. केवळ देशी बियाण्यांचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार हाच आमचा अजेंडा आहे.” शाळेच्या इको क्लबमधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दल त्यांनी कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना मिळणारा चांगला प्रतिसाद पाहून ते भारावून गेल्याचेही सांगितले. त्यांच्या मते, हे एक प्रकारचे प्रोत्साहनच आहे, जे विद्यार्थ्यांना पर्यावरणासाठी अधिक सक्रिय करेल.
मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी अध्यक्ष प्रशांत नाईक यांचे आभार मानले.
संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा हा उपक्रम शिक्षण आणि पर्यावरण संरक्षणाचा एक आदर्श संगम साधणारा असून, तो इतर शैक्षणिक संस्थांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो.