जळगाव, (प्रतिनिधी) : कवी कुलगुरू कालिदास यांना वंदन करणाऱ्या “आषाढस्य प्रथम दिवसे” या पवित्र दिवसाचे औचित्य साधून, जळगावच्या ‘परिवर्तन’ संस्थेतर्फे कवी गुलजार यांच्या शायरी, कविता आणि गाण्यांचा एक अविस्मरणीय कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. गणपती नगर येथील रोटरी हॉलबाहेर कोसळणाऱ्या पावसाच्या सरींमध्ये, सभागृहात मात्र शब्द आणि स्वरांच्या वर्षावाने रसिक अक्षरशः चिंब न्हाऊन निघाले.
‘परिवर्तन’च्या कलावंतांनी या दिवशी गुलजारांच्या अनोख्या शायरीचा सखोल शोध घेतला. शंभू पाटील यांनी आपल्या ओघवत्या निवेदनातून साहित्य आणि सिनेमा क्षेत्रातील गुलजार यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांसमोर उलगडले. गुलजारांच्या कविता आणि त्यातील विविध रूपांचे अनेक उदाहरणांसह सादरीकरण करण्यात आले, ज्यामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
या कार्यक्रमात गायक वरुण नेवे यांनी ‘दिल तो बच्चा है जी’, ‘तुम आ गये हो नूर आ गया है’, ‘ये जिंदगी गले लगा ले’ आणि ‘आनेवाला पल’ यांसारखी लोकप्रिय गाणी सादर करत उपस्थितांची मने जिंकली. तर गायिका रजनी पवार यांनी ‘नाम गुम जायेगा’, ‘आज कल पाव जमी पर’, ‘मोरा गोरा रंग’ आणि ‘मेरा कुछ सामान’ ही गाणी गाऊन गुलजारांच्या शब्दांची जादू श्रोत्यांवर केली.
डॉ. सोनाली महाजन यांनी ‘किताबे’, ‘उसका मजहब’, ‘खुदा’ या गुलजारांच्या प्रसिद्ध कवितांचे सादरीकरण केले, तर डॉ. अविनाश भोसले यांनी ‘नाराज है शायद’ आणि इतर काही कविता सादर करून दाद मिळवली.
या कार्यक्रमाची संकल्पना अनिल कांकरिया आणि अमर कुकरेजा यांची होती, तर नारायण बाविस्कर यांनी उत्कृष्ट दिग्दर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल निंबाळकर, अक्षय नेहे, गणेश सोनार, आणि जय सोनार यांनी तंत्र सहाय्य केले. तसेच, अनिश शहा आणि किरण बच्छाव यांनी निर्मिती प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. यावेळी मोठ्या संख्येने रसिक प्रेक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाला मिळालेला उत्तम प्रतिसाद इतका होता की, जागेअभावी अनेकांना परतावे लागले. यातून जळगावकरांचे साहित्य आणि कलेवरील प्रेम पुन्हा एकदा दिसून आले.