जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील बसस्थानकाजवळून एका वयोवृद्ध महिलेला फसवून त्यांच्या गळ्यातील आठ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत लंपास करणाऱ्या बाप-लेकांपैकी एकाला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. दुसरा आरोपी, त्याचा मुलगा, अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या कारवाईमुळे अशा प्रकारच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १५ एप्रिल २०२५ रोजी कस्तुराबाई लक्ष्मण पाटील (वय ६०, रा. जामनेर गाव, ता. पाचोरा) या जळगाव शहरातील बसस्थानकापासून भजे गल्लीतून आपल्या मुलाच्या घरी पायी जात असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांना खोटी हकीकत सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील आठ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत फसवणूक करून घेऊन पसार झाले होते. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इसमांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्याकडे सोपवण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्यात काही संशयित इसमांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. हे दोघे बाप-लेक असून ते जखनीनगर, संत चोखामेळा हॉस्टेलच्या मागे, जळगावात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे दि.०४ जून २०२५ रोजी शोध मोहीम राबवून गुन्ह्यातील एक आरोपी गुलजार लाठीया बजरंगी (वय ७७ वर्षे) यास ताब्यात घेण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात आणल्यानंतर त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने आपल्या मुलासह इतर साथीदारांसोबत हा गुन्हा केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकलही जप्त करण्यात आली आहे. पुढील कारवाईसाठी त्याला जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सफौ/ अतुल वंजारी, अक्रम शेख, हरिलाल पाटील, विजय पाटील, प्रवीण भालेराव, किशोर पाटील यांनी यशस्वीपणे पार पाडली. आरोपीच्या मुलाचा शोध सुरू असून, या घटनेतून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.