जळगाव, (प्रतिनिधी): जळगावातील घाणेकर चौकात एका ७२ वर्षीय वृद्धाला दोन भामट्यांनी फसून त्यांच्या दोन अंगठ्या लंपास केल्याची घटना १ जून रोजी घडली आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माऊली नगर येथील रहिवासी सुरेश पंढरीनाथ भोळे (७२) हे घाणेकर चौकात उभे असताना एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आला आणि त्याने आश्रमाचा पत्ता विचारला. थोड्या वेळाने दुसरा एक व्यक्ती तिथे आला आणि तोही भोळे यांच्याशी बोलू लागला. पहिल्या व्यक्तीने भोळे यांना हातात दगड ठेवण्यास सांगितले आणि तो जवळच्या मंदिराजवळ निघून गेला. त्यानंतर दुसरा व्यक्ती भोळे यांना मंदिराजवळ घेऊन गेला. तिथे त्याने भोळे यांना आपली मूठ उघडण्यास सांगितले असता, आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या दगडाचे रुद्राक्ष झाले होते. यानंतर, भामट्यांनी भोळे यांना त्यांच्या अंगठ्या शंभर रुपयांच्या नोटेत गुंडाळून पिशवीत ठेवण्यास सांगितले. भोळे यांनी त्यांच्या सूचनेनुसार अंगठ्या पिशवीत ठेवल्या.
भामट्यांनी भोळे यांना तेथून निघून जाण्यास सांगितले. मात्र, त्यानंतर भोळे यांनी पिशवीतील पुडी पाहिली असता, त्यात अंगठ्या नव्हत्या. त्यांनी मागे वळून पाहिले असता, ते दोन्ही भामटे तेथून पसार झाले होते.