जळगाव, (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यातील पाल येथील गारबर्डी गावाजवळच्या घाटात बुधवारी रात्री (४ जून) फैजपूरहून मध्यप्रदेशकडे मजुरांना घेऊन जाणारा एक भरधाव मालवाहू टेम्पो उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात १९ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, २२ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जळगावसह इतर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. रावेर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल उर्फ अरविंद माका बारेला (वय १९, रा. मलगाव कोठा, ता. जिरण्या, जि. खरगोन, मध्यप्रदेश) असे मृत तरुणाचे नाव आहे. फैजपूर येथे मजुरीचे काम करून मलगाव कोठा गावचे हे मजूर काल रात्री ८ वाजता आपल्या गावाकडे परत निघाले होते. रावेर तालुक्यातील गारबर्डी गावाजवळ असलेल्या घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव टेम्पो अचानक पलटी झाला. रात्रीच्या अंधारात काही कळायच्या आतच हा अपघात घडला.
अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांना खबर दिली. त्यानंतर मिळेल त्या वाहनाने जखमींना पाल येथील आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले. यापैकी ७ जणांना अधिक उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
उपचार सुरू असतानाच अनिल बारेला याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अनिलच्या पश्चात आई-वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे. तो मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. अनिलच्या मृत्यूमुळे रुग्णालयात त्याच्या पित्याला आवरता आला नाही. या घटनेची रावेर पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून, अनिल बारेला याच्या मृत्यूबाबत जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात प्राथमिक अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या अपघातामुळे मलगाव कोठा गावामध्ये शोककळा पसरली आहे. काल दिवसभरात जळगाव जिल्ह्यात घडलेल्या अनेक अपघातांमुळे जिल्ह्याचे वातावरण चिंतेचे होते.
जखमींची नावे…
चालक धरम नरोम सिसोदिया (वय २०), भुरीबाई नवा बारीला (वय १८), लाडकीबाई रीछू भिलाला (वय ३०), नुस्तीबाई रिछू भिलाला (वय ५५), सुमलीबाई प्रेमसिंग बारेला (वय ५०), लक्ष्मी सोमसिंग बारेला (वय १६), शेवता वेसासिंग बारेला (वय २५), रूपा कालू बारेला (वय १६), दयाराम कालू बारेला (वय २०), पार्वती मधू बारेला (वय १२), सविता रामदास बारेला (वय १४), आशा मधू बारेला (वय १६), विकास वेचता बारेला (वय १५), हिरालाल गोरालाल बारीला (वय ३०), सुभान कीछू बारेला (वय ३२), सुरेश चेनसिंग भिलाला (वय १८), विजय अशोक बारेला (वय १५), सायली होवळसिंग बारेला (वय १५), रंजीता संजू बारेला (वय १४), भुरी गोडा बारेला (वय १८) आणि रघुवीर कालू बारेला (वय १८). (सर्व रा. कोठा, ता. जिरण्या, जि. खरगोन, मध्यप्रदेश)