जळगाव, (प्रतिनिधी) : ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या यशस्वी गाथांमधून प्रेरणा घेत, महिला व मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे देण्यासाठी आणि शिवकालीन कला अवगत करण्यासाठी निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान आणि युवा विकास फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्ह्यात दहा दिवसीय शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर महिला व मुलींना दांडपट्टा आणि लाठीकाठीचे विशेष प्रशिक्षण देणार आहे.
या शिबिराचे उद्घाटन जळगावचे आमदार सुरेश भोळे, विष्णू भंगाळे, मनीष जैन, मनोज पाटील, डाॅ. केतकी पाटील, डाॅ. अमृता सोनवणे, डॉ. नीलेश चांडक, माजी क्रीडा अधिकारी किरण जावळे, भारती चौधरी आणि प्रणेश ठाकूर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मावळा प्रतिष्ठानच्या परी महाजन आणि त्यांच्या सहकारी टीमने दांडपट्टा, तलवारबाजी आणि लाठीकाठीचे उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. या दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिरात महिला व मुलींना अनुभवी प्रशिक्षकांकडून दांडपट्टा आणि लाठीकाठीचे विशेष प्रशिक्षण दिले जाईल. विशेष बाब म्हणजे, शिबिरातील उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीला ‘शिवकन्या शिष्यवृत्ती’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी अध्यक्षा शारदा सोनवणे, सचिव धीरज जावळे, पूनम भाटिया, विजया पांडे, शिल्पा मांडे, विवेक महाजन, धनंजय सोनवणे, आशिष चव्हाण, भैया पाटील, वेदांत ताडे, पार्थ ठाकूर आणि किशोर पांडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश जावळे यांनी केले, तर धीरज जावळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.