अमळनेर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील मंगरूळ एमआयडीसीजवळ झालेल्या भीषण अपघातात रिक्षा चालक तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. २० मे रोजी सकाळी ७ वाजता घडली आहे. दहिवद येथून धुळ्याकडे जाणाऱ्या चारचाकी व अमळनेर कडे येणाऱ्या रिक्षाचा हा अपघात झाला आहे. अमळनेर पोलीस स्टेशनला कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भटू दिलीप पाटील (वय २९, रा. जय भवानी नगर, ताडेपुरा, अमळनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात वडील, पत्नी, लहान भाऊ असा परिवार आहे. रिक्षा चालवून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. ३ महिन्यांपूर्वीच भटू पाटील याचा विवाह झाला होता. दरम्यान, प्रवासी मिळाल्यामुळे भटू पाटील हा लोंढवे गावी त्याची रिक्षा (एमएच ४१ एएफ १३५६) ने प्रवासी घेऊन गेला होता. तेथून अमळनेरला परतत असताना मंगरूळ एमआयडीसी समोर भरधाव महिंद्रा कारने (एमएच १८ एजे ९५८८) त्याच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत भटू पाटील गंभीर जखमी झाला.
ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. तर भटू पाटील याच्या नातेवाईकांसह मित्र परिवाराने रुग्णालयात एकच गर्दी केली होती. घटनेमुळे ताडेपुरा भागात शोककळा पसरली असून अमळनेर पोलीस स्टेशनला नरेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार कार चालक अविनाश भय्यासाहेब पाटील (रा. दहिवद ता. अमळनेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.