जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील मेहरूण तलावनाजीक असलेल्या मलारा हाऊस या ठिकाणी नाट्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं असून त्याचे उद्घाटन रंगकर्मी मंजुषा भिडे आणि रंगकर्मी नारायण बाविस्कर यांच्या उपस्थितीत करण्यात करण्यात आले. याप्रसंगी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक उपायुक्त योगेश पाटील, तहसीलदार सुचिता चव्हाण, मल्हार कम्युनिकेशनचे आनंद मल्हारा, डॉ. नलिनी मलारा, जिल्हाधिकारी कार्यालयातील राज्य शिष्टाचार विभागाच्या रूपाली काळे यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
जळगाव शहरातील रंगकर्मी योगेश पाटील हे सध्या बंगळुरू येथे कार्यरत असून त्या ठिकाणी ते नाटकाचे प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. सुट्टीच्या दरम्यान आपल्या शहरातील लहान मुलांना नाटकाचं शास्त्रशुद्ध शिक्षण मिळावं तसेच थेटर इन एज्युकेशन या विषयातील धडे शिबिराच्या माध्यमातून बालपणापासूनच मुलांना द्यावेत यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून निवडक अशा २५ विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात आलेला आहे.
या शिबिराचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी मलारा हाऊसच्या प्रांगणात पार पडला. याप्रसंगी तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी शिबिराच्या माध्यमातून मुलांच्या मनातील सुप्त गोष्टींना व कलांना वाव मिळणार असून त्यांच्यात आत्मविश्वासाची क्षमता वाढीस लागते आणि हे या शिबिरातून त्यांना मिळेल असे मत व्यक्त केले. अभिनेत्री मंजुषा भिडे यांनी मुलांशी संवाद साधला आणि नाट्य शिबिराचे महत्व समजावून सांगितले.
शहरातील वेगवेगळ्या भागातील विद्यार्थी या शिबिरात सहभागी झालेले आहेत. २ मे ते ११ मे पर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे. शिबिरात अभिनय, सर्जनशीलता, कला, चित्रकला, थेटरिकल गेम- खेळ अशा विविध अंगाने मुलांना शोध घ्यायला हे शिबिर शिकवणार आहे तसेच अनेक मान्यवर वक्ते ही सहभागी होणार असल्याचे प्रशिक्षक योगेश पाटील यांनी सांगितले आहे.