अमळनेर, (प्रतिनिधी) : शहरातील झामी चौकात एका तरुणाला काहीही कारण नसताना डोक्यात कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी दि. १९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता समोर आली आहे. रविवारी २० एप्रिल रोजी मध्यरात्री एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर शहरातील वडचौक परिसरात सोनू महारु पाटील हा तरुण त्याचा मित्र मनोज बबन ठाकरे यांच्यासोबत शहरातील झामी चौकात उभा होता. त्यावेळी काही कारण नसताना संशयित आरोपी सुशील जाधव (रा. झामी चौक) भांडण करू लागला. त्यानंतर हातात कुऱ्हाड धरून सोनूच्या डोक्यात वार करून दुखापत केली. तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेले त्याचा मित्र सागर सैंदाणे याला देखील मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. जखमी झालेल्या सोनूला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान या संदर्भात सोनू याची आई आशाबाई महारु पाटील (वय ५०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सुशील जाधव यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष पवार करीत आहेत.