जळगाव, (प्रतिनिधी) : मागील चार वर्षापासून देवगिरी शॉर्टफिल्म फेस्टिवल अनेक यश गाठत असून दरवर्षी या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आपल्या गाव खेड्यातील आणि नागरी भागातील तरुणाई अनेक चांगले विषय घेऊन फिल्म तयार करत आहे ही अभिमानाची गोष्ट असून यामधून शॉर्टफिल्मच्या माध्यमातून मनोरंजनासोबत भारतभक्ती व समाज जागरण होत आहे ही आपली चांगली उपलब्धि असल्याचे प्रतिपादन रा. स्व. संघाचे प्रांत सहकार्यवाह स्वानंद झारे यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या बीज भाषणात केले. या कार्यक्रमप्रसंगी अभिनेते गिरीश कुलकर्णी व जळगावचे भूमिपुत्र व दिग्दर्शक नितीन भास्कर या दोघांचा देवगिरी चित्र गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
अजिंठा फिल्म सोसायटी व देवगिरी चित्र साधना द्वारा आयोजित चौथा देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल ८ फेब्रुवारी २०२५ रोजी जळगावात छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे संपन्न होत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रनगरीमध्ये सुरू झालेल्या या महोत्सवात उद्घाटन प्रसंगी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, आ. सुरेश भोळे, आ. मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, दिग्दर्शक अरुण शेखर, प्रांत कार्यवाह स्वानंद झारे, अजिंठा फिल्म सोसायटीचे अध्यक्ष डॉ. जयंत शेवतेकर, अभिनेते गिरीश कुलकर्णी, दिग्दर्शक नितीन भास्कर, प्रांत संयोजक किरण सोहळे, सह प्रांतसंयोजक विनीत जोशी, डॉ. जयंत लेकुरवाळे व गणमान्य नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रद्धा शुक्ला व अनुराधा पत्की यांनी केले. तत्पूर्वी शॉर्टफिल्म ‘पुरिया’ ने सुरुवात झाली.
यावेळी चित्रपट विषयक प्रदर्शनी, शॉर्ट फिल्म स्क्रीनिंग, मास्टर क्लास, चर्चासत्र, ओपन फोरम, टुरिंग टॉकीज तसेच रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांसह उद्घाटन व समापन सोहळा अशा विविध कार्यक्रमांनी हा महोत्सव सुरू झाला. यंदा या महोत्सवाचे ४ थे वर्ष असून खान्देश व मराठवाडा क्षेत्रासह संपूर्ण राज्यातून या महोत्सवासाठी १५० हून अधिक शॉर्टफिल्म सहभागी झाल्या आहेत. आज पहिल्या दिवशी ४२ शॉर्टफिल्मचे स्क्रिनिंग दाखवण्यात आले व मास्टर क्लासमध्ये दिग्दर्शक अरुण शेखर व अभिनेता गिरीश कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. तसेच सायंकाळी भाऊंचे उद्यान येथे टुरिंग टॉकीज मध्ये ‘श्री ४२०’ हा चित्रपट दाखवण्यात आला. उद्या ९ फेब्रुवारी रोजी उर्वरित शॉर्टफिल्म चे स्क्रिनिंग व सायंकाळी पुरस्कार वितरण ना. मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते होणार आहे.