जळगाव, (प्रतिनिधी) : कर्नाटक एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्टेशनवर आलेल्या एका उत्तर प्रदेश मधील व्यापाऱ्याला दुचाकीवर बसवून नेत मारहाण करून त्याच्या खिशातील ३०० रुपये आणि ऑनलाईन पद्धतीने दोन हजार रुपये लुटण्याचा प्रकार घटला होता. दरम्यान तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेश येथील मूळ रहिवासी असलेल्या आणि धुळे येथील व्यापारी शाहिद मुन्ना कुरेशी (वय ३४) हे कर्नाटक एक्सप्रेसने जळगावला रेल्वे स्टेशन जवळ उतरले असता पान टपरीवर पान घेण्यासाठी थांबले होते. या ठिकाणी तीन जणांनी अचानक येऊन शाहिद कुरेशी यांना मारहाण करून दुचाकी वर बळजबरीने भुसावळ रोडवरील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज येथे नेऊन तेथे वीस हजार रुपयांची मागणी केली.
व्यापारी असलेले शाहिद कुरेशी यांनी ऑनलाईन पद्धतीने दोन हजार रुपये आणि त्यांच्या खिशातील तीनशे रुपये त्या तिघांना काढून दिले. तिघांनी शाहिद कुरेशी यांना दमदाटी करून सोडून दिले. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्यासह डीबी पथकाने वेगात चक्रे फिरवून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारावरून संशयित यश रवींद्र पाटील (वय २१ रा आव्हाणे), मनोज आधार सोनवणे (वय २३, रा कांचन नगर), आणि महेंद्र पांडुरंग पाटील (वय २८, रा वाटिका श्रम जळगाव) या तिघांना रात्री दहा वाजेच्या सुमारास अटक केली. त्यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र शिखरे करीत आहे.