जळगाव, (प्रतिनिधी) : ‘सुदृढ व आनंददायी जीवन जगण्यासाठी खेळ व व्यायाम अत्यावश्यक आहेत. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात किमान एक तास खेळ किंवा व्यायामासाठी द्यायला हवा,’ असे प्रतिपादन आमदार राजू मामा भोळे यांनी केले.
सहाय्यक आयुक्त कार्यालय, समाज कल्याण विभाग, जळगाव यांच्या वतीने आयोजित मागासवर्गीय मुला-मुलींसाठीच्या शासकीय वस्तीगृह कला व क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर प्रवीण कुमार, जळगाव जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, कार्यालय अधीक्षक राजेंद्र कांबळे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात आ. राजू मामा भोळे यांच्या हस्ते फुगे हवेत सोडून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर त्यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी केले. गृहपाल वैशाली पाटील, सुजाता लासुरे, एस. आर. पाटील, कुंदन पाटील, धनंजय सपकाळे, निरीक्षक एस. एस. महाजन, आर. सी. पाटील तसेच समाजकल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.