रायगड, (जिमाका) : भारताची आध्यात्मिक संस्कृती अभ्यासकांना समाजाशी जोडते, करुणा वाढवते आणि त्यांना सेवेकडे नेते. खरी सेवा ही नि:स्वार्थी असते. आपल्या आध्यात्मिक संस्कृतीचा मुख्य पाया सेवाभाव असून आपले सरकार हाच सेवाभाव ठेवून काम करीत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले.
भारताच्या सांस्कृतिक वारसाला चालना देण्याच्या वचनबद्धतेनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खारघर येथील श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिर या इस्कॉन प्रकल्पाचे लोकार्पण संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. नवी मुंबई मधील खारघर येथील नऊ एकर परिसरात वसलेल्या या प्रकल्पात अनेक देवदेवतांची मंदिरे, वैदिक शिक्षणाचे केंद्र, प्रस्तावित वस्तुसंग्रहालय, सभागृह, आणि उपचार केंद्र यांचा समावेश असून विश्वबंधुत्व, शांतता आणि सौहार्द वाढविणे, हे वैदिक शिक्षण केंद्राचे उद्दिष्ट आहे.
यावेळी व्यासपीठावर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार हेमा मालिनी, इस्कॉन मंदिर मुख्य चिकित्सक सूरदास प्रभु उपस्थित होते. प्रधानमंत्री मोदी यांचे स्वागत मुख्य चिकित्सक सूरदास प्रभू आणि खासदार हेमामालिनी यांनी केले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपला भारत देश विलक्षण आणि अद्भुत भूमी असलेला आहे. देश केवळ भौगोलिक सीमांनी बांधलेला भूमीचा तुकडा नसून जिवंत संस्कृती आणि जिवंत भूमीचे प्रतीक आहे. आपल्या या संस्कृतीचे सार हे आध्यात्म आहे आणि भारताला समजून घेण्यासाठी आधी आध्यात्म स्वीकारले पाहिजे. जगाकडे केवळ भौतिक दृष्टीकोनातून पाहणारे भारताला विविध भाषा आणि प्रांतांचा संग्रह म्हणून पाहतात. जेव्हा कोणी त्यांचा आत्मा या सांस्कृतिक जाणिवेशी जोडतो तेव्हा त्यांना खऱ्या अर्थाने भारत दिसतो. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी गीतेद्वारे भगवान कृष्णाचे गहन ज्ञान उपलब्ध करून दिले. त्याचप्रमाणे श्रील प्रभुपादांनी इस्कॉनच्या माध्यमातून गीता लोकप्रिय केली, भाष्य प्रकाशित केले आणि लोकांना तिच्या साराशी जोडले. वेगवेगळ्या ठिकाणी आणि काळात जन्मलेल्या या संतांनी प्रत्येकाने आपापल्या अनोख्या पद्धतीने कृष्णभक्तीचा प्रवाह पुढे नेला आहे. ते पुढे म्हणाले की त्यांच्या जन्मकाळात, भाषांमध्ये आणि पद्धतींमध्ये फरक असूनही, त्यांची समज, विचार आणि जाणीव एक होती आणि या सर्वांनी भक्तीच्या प्रकाशाने समाजात नवीन चैतन्य, प्रेरणा दिली. नवी दिशा आणि ऊर्जा दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इस्कॉन मंदिराचे मुख्य चिकित्सक सूरदास प्रभू यांनी केले. या कार्यक्रमास इस्कॉन मंदिराचे सदस्य, प्रसिद्ध आध्यात्मिक नेते आणि संत आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.