जळगाव, (प्रतिनिधी) : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक माध्यमिक विद्यालय नेहमी भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी अग्रेसर असते. असाच एक प्रयोग नाताळ निमित्त शाळेत करण्यात आला. डोक्यावर मोरपिसांची टोपी, धोतर, कमरेला उपरणे, एका हातात चिपळ्या, दुसऱ्या हातात टाळ आणि काखेत झोळी अशा वेशात वासुदेव आला हो वासुदेव आला म्हणत विद्यार्थ्याने प्रवेश केला. मुले देखील त्याला पाहून आनंदली.
आपली संस्कृती लोककला देखील मुलांना समजली पाहिजे याहेतूने शाळेच्या आवारात ‘वासुदेव आला हो वासुदेव आला’ हि लोककला मुलांना दाखवण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद घेतला. वासुदेवाच्या वेषात आलेल्या विद्यार्थ्यांने इतर विद्यार्थ्यांना आपल्या झोळीतून शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
हल्ली इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाश्चिमात्य गोष्टी शिकविणारे अनेक उपक्रम घेतले जातात. मग अगदी काल परवा नाताळ साजरा करताना सांताक्लॉज देखील प्रत्येक शाळेत अवतरले जातील. परंतु आम्ही आमच्या शाळेत वासुदेव अवतरले असे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.