जळगाव, (प्रतिनिधी) : मंजुला लेखिकेचे आपलेच प्रतिबिंब हे प्रश्न विचारून तिच्या मनातील रहस्य शोधत लेखिकेला बोलतं करणारे ‘बिखरे बिंब’ प्रेक्षकांना अंतर्मुख करणारे नाटक सादर झाले. नागपूर येथील मिराकी थिएटर निर्मित बिखरे बिंब नाटकाचे सादरीकरण परिवर्तन मैत्र महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सादर करण्यात आले.
मूळ लेखक गिरीश कर्नाड यांच्या नाटकाचे हिंदी सादरीकरण नागपूर येथील कलावंतांनी केले. याप्रसंगी प्रसिद्ध कायदेतज्ञ नारायण लाठी, उद्योजक युसुफ मकरा, जेष्ठ रंगकर्मी शरद पांडे, संजय निकुंभ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
महोत्सव प्रमुख स्वरुप लुंकड, नंदु अडवाणी, विनोद पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. नाटकात मेहक त्रिपाठी यांनी प्रमुख भूमिका केली, अतुल आढे यांचे दिग्दर्शन व अभिनय केला. निकिता धाकुलकर, अक्षय खोब्रागडे, दुर्गेश कुहिके यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, रंगमंच व्यवस्था सांभाळली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मनोज पाटील यांनी केले.
महोत्सवात आज दि.२३ डिसेंबर रोजी ‘सांस्कृतिक विश्व व माध्यमं’ याविषयावर महावीर क्लास येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.