मालेगाव येथील चोरीचा डंपर जळगावात सापडला
जळगाव, (प्रतिनिधी) : मालेगाव येथून चोरी गेलेला डंपर शोधण्यात जळगावच्या एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. हा डंपर जळगावच्या एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने संपूर्ण परिसर पिंजून काढला. यावेळी त्यांना या डंपरचा शोध लागला.
नाशिक जिल्ह्यातील ऋषिकेश महारू मोरे यांच्या मालकीचा अकरा लाख रुपये किमतीचा डंपर (एम.एच.१५ डी के- ९७५३) हा लोनवाडे येथून दि.११ डिसेंबर रोजी चोरीला गेला होता. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका पोलिस स्टेशन मध्ये गु.र.न.७१६/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास अधिकारी पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना सदरचा डंपरचा शोध घेणे बाबत कळविले असता पोलिस निरीक्षक यांनी गुन्हे शोध पथकातील पोउपनि शरद बागल यांना सदर डंपरचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिस पथकाला घेत, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पाहणी करीत असताना हा डंपर एमआयडीसी परिसरात गेल्याचे दिसून आले. सतत दोन दिवस संपूर्ण परिसर शोधून काढत असताना शुक्रवारी दि. १३ डिसेंबर रोजी हा डंपर फातिमानगर परिसरात निर्जन स्थळी उभा असल्याचे दिसून आले. यावेळी पंचनामा करून डंपर ताब्यात घेऊन मालेगाव तालुका पोलिस स्टेशन यांचा ताब्यात देण्यात आला.
ही कार्यवाही पोलिस अधीक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांचे मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोउपनि शरद बागल, पोकॉ विशाल कोळी, राहुल रगडे,पोना योगेश बारी यांनी केली आहे.