जळगाव, (प्रतिनिधी) : महानगरपालिकेत बातमी घेण्याच्या उद्देशाने गेलेल्या पत्रकाराचा कॅमेरा जप्त करून मेमरी कार्ड काढून घेतल्याचा प्रकार नुकताच घडला होता. दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, याबाबत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेतर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना शुक्रवारी निवेदन देण्यात आले.
विक्रम कापडणे हे महानगर पालिकेत बातमी घेण्याकरिता गेले असता त्यांचा व्हिडिओ कॅमेरा हिसकावून घेत त्यातील मेमरी कार्ड काढण्याचा प्रकार झाला होता. याबाबत सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांच्याविरुद्ध शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद रूले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शहरातील पत्रकार उपस्थित होते.