धुळे, (प्रतिनिधी) : तालुक्यातील निमखेडी येथे एका सात वर्षीय विद्यार्थिनीचा घशात पेनाचे टोपण अडकल्याने मृत्यू झाल्याची हृदय द्रावक घटना गुरुवारी घडली आहे. दरम्यान ती दुपारी आपल्या वर्गात पेनाच्या टोपणशी खेळत असताना हा प्रकार झाला.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असलेली अर्चना युवराज खैरनार (वय ७, रा. निमखेडी, ता. जि. धुळे) या विद्यार्थिनीने शाळेतील आपल्या वर्गात खेळत असताना पेनाचे टोपण गिळून घेतले. दरम्यान तिला त्रास जाणवू लागल्याने शाळेतील शिक्षकांनी अर्चना हिला येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.
वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचल्या नंतर तेथील डॉक्टरांनी लागलीच उपचार सुरू केले. मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉ. प्रकाश सुकडे यांनी तपासुन तिला मृत घोषित केले. यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. यासंदर्भात धुळे तालुका पोलिस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.