मुंबई, (प्रतिनिधी) : राज्यात नव्या सरकारचा शपथविधी सोहळा आज दि.५ रोजी आझाद मैदानावर आयोजित केला आहे. शपथविधीसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महत्त्वाचे नेते देखील उपस्थित राहणार आहेत. यासाठी मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. यात सुमारे पाच हजारपेक्षा जास्त पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, दक्षिण मुंबईला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
शपथविधी समारंभादरम्यान घातपात तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी खबरदारी घेतली असून सोहळ्यादरम्यान पाच अतिरिक्त पोलिस आयुक्त, १५ उपायुक्त, २९ सहायक पोलिस आयुक्त यांच्यासह ५२० अधिकारी आणि साडेतीन हजार कर्मचारी असा भलामोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याबरोबरच महत्त्वाच्या ठिकाणी ‘एसआरपीएफ’च्या प्लाटून, जलद प्रतिसाद पथक (क्यूआरटी), दंगलनियंत्रण पथक, डेल्टा, कॉम्बॅक्ट, बॉम्बशोधक व नाशक पथक यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.
दंगलनियंत्रण पथक, एसआरपीएफ, वाहतूक पोलिस विभाग देखील सज्ज असणार आहे. पार्किंगसाठी जागा नसल्याने शपथविधीसाठी येताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. गोंधळ होऊ नये, यासाठी शपथविधी सोहळयासाठी येणाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे. तत्काळ मदतीसाठी पोलिस हेल्पलाइन क्रमांक १००, ११२ येथे संपर्क साधावा, असेही पोलिसांनी सांगितले आहे.