किरण चौधरी | जामनेर, (प्रतिनिधी) : येथील शास्त्रीनगर भागातील रहिवासी खुशालसिंग दावलसिंग पवार यांच्या घराला आग लागल्याची घटना शनिवारी घडली आहे. देव्हाऱ्यात लावलेल्या दिव्यामुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
खुशालसिंग पवार हे स्वयंपाकी असून लग्न समारंभ, छोट्या मोठ्या कार्यक्रमांच्या ऑडर ते करीत असतात. ऑर्डर साठी पती-पत्नी दोघे कुलूप लावून बाहेर गेले असता हा प्रकार घडला. दरम्यान घरात लागलेल्या आगीत त्यांचा संसार संपूर्ण उध्वस्त झाला आहे.
अचानक लागलेल्या आगीमुळे आजू बाजूच्या रहिवाश्यांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येत नसल्याने नागरिकांनी घटनेची माहिती पालिकेच्या अग्नीशामक दलाला दिली. वेळीच गॅस सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. आगीत घरातील टिव्ही , फ्रीज यासह संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे.
आजू बाजूला दाट वस्ती असल्याने घटनेचे गांभीर्य ओळखून अग्नीशामक दल तात्काळ घटनास्थळी दाखल होत शर्थीचे प्रयत्न केले व आग आटोक्यात आणली. आगीत पवार यांचे मोठे नुकसान झाले असून शासनाच्या वतीने त्यांना मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे.