जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यात मतदान कर्तव्यावर असलेला कर्मचारी आपले निवडणुकीचे काम आटपून घरी जात असताना त्यांच्या मोटरसायकलचा चोपडा शिरपूर रस्त्यावरील कलंगी चौकात अपघात होऊन त्यात त्यांचे दुर्दैवी निधन झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे
लक्ष्मीकांत वासुदेव पाटील उपशिक्षक (बी.एल.ओ.) अनवर्दे -बुधगांव (वय -४९, रा.बभळाज ता. शिरपूर) असे मयत मतदान कर्मचाऱ्यांचे नाव आहे. दरम्यान लक्ष्मीकांत पाटील हे आपली निवडणूक ड्युटी बजावून त्यांच्या बभळाज ता. शिरपूर या मूळगावी परत जात असताना चोपडा-शिरपूर रस्त्यावरील कलंगी चौकात सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मोटारसायकलचा अपघात झाला.
दरम्यान त्यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. सदर घटनेची नोंद चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन करण्याचे काम रात्री उशिरा सुरू होते. या दुर्दैवी घटने संदर्भात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.