पाचोरा, (प्रतिनिधी) : पाचोरा मतदारसंघात व्यापार बांधवांच्या उद्योग वाढीसाठी मूलभूत सुविधांसोबतच भयमुक्त वातावरणामुळे व्यापार वाढीला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत झाली असून आपण पाचोरा शहरात व्यापारी बांधवांच्या मागणीप्रमाणे भव्य असे सर्व सुविधा युक्त व्यापारी भवन शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी निर्माण करू शकलो याचे आपल्याला मनस्वी समाधान असल्याचे भावना आमदार किशोर आप्पा पाटील यांनी बोलून दाखवली. पाचोरा शहरात जैनपाठ शाळेत रविवारी संध्याकाळी सहा वाजता झालेल्या व्यापारी मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी मंचावर भारतीय जनता पक्षाचे निरीक्षक गांधीनगर महापालिकेचे उपमहापौर प्रेमळसिंह गोल, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे, कांतीलाल जैन, मुन्ना राजपूत, नंदू सोमवंशी,संजय गोहिल, शरद पाटील राम केसवाणी,विनय सेठ, बापू सोनार आदि उपस्थित होते.
आ. किशोरआप्पा पाटील पुढे म्हणाले की, व्यापारी आणि माझे नेहमी घनिष्ठ संबध राहीले आहे. व्यापारी वृध्दिसाठी मी नेहमी प्रयत्नशील राहीलो आहे. व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्न केले आहेत. पाचोरा शहरात व्यापारी भावनांची निर्मिती करून व्यापाऱ्यांना दिलेला शब्द पुर्ण केला आहे. आगामी काळात ही व्यापाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील अशी ग्वाही दिली. आपण पाचोरा शहरात व्यापारी संकुल उभे करून छोट्या व्यावसायिकांना ही चालना देण्याचे काम केले आहे.