जळगाव शहर मतदार संघातून मिळाली उमेदवारी
जळगाव, दि.२५ (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहर मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवारीवरून असणारा तिढा आता सुटला आहे. दरम्यान जळगाव शहर मतदार संघात माजी महापौर जयश्री सुनील महाजन यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरेंची मशाल घेऊन महाजन विधानसभेच्या रिंगणात प्रथमच उतरणार आहेत.
महाविकास आघाडीतील शरद पवार गटाच्या माध्यमातूनही माजी महापौर जयश्री महाजन यांना उमेदवारी मिळावी यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात होते. मात्र महाविकास आघाडीची जागा कायम ठेऊन जळगाव ग्रामीणसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर यांना तर जळगाव शहर मतदार संघासाठी जयश्री महाजन यांची उमेदवारी आता निश्चित झाली असल्याने सौ.महाजन विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महायुतीतुन भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विद्यमान आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांच्या विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून माजी महापौर जयश्री महाजन, मनसे कडून डाॅ. अनूज पाटील आणि अपक्ष अशी लढत पहायला मिळणार आहे. त्यामुळे जळगाव शहर मतदार संघातील आखाड्यात कोण बाजी मारेल याकडे राजकीय वर्तुळातील जाणकारांचे लक्ष लागले आहे.