मतदार विरोधकांच्या छाताडावर भगवा फडकाविल्याशिवाय राहणार नाही – गुलाबराव पाटील
धरणगाव / जळगाव दि.२४ (प्रतिनिधी) : महायुतीतील सर्व घटक पक्षांचे सुमारे २० हजाराच्यावर कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी आज जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेच्या वतीने महायुतीचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. श्री बालाजी मंदिरात दर्शन घेऊन ना. पाटील यांची भव्य रॅली सुरू झाली. यानंतर या रॅलीचे सभेत रूपांतर झाले. सभेत गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. “जनता आणि कार्यकर्त्यांचा उत्साह हे माझ्यासाठी टॉनिक आहे,” असे म्हणत त्यांनी जनतेचे आभार मानले आणि विक्रमी मताधिक्याने विजय मिळवण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला. त्यांनी उपस्थितांना आवाहन केले की, आगामी निवडणुकीत कोणताही निष्काळजीपणा न करता १ महिना मेहनत घ्यावी. तुमच्यासह व लाडक्या बहिणीच्या मेहनतीने व साथीने विरोधकांच्या छाताडावर भगवा फडकाविल्याशिवाय राहणार नाही याची १०० % खात्री आहे. येत्या २७ तारखेला श्री क्षेत्र पद्मालय येथे प्रचार नारळ फोडणार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. दरम्यान, अर्ज दाखल करून आल्यानंतर ना. गिरीश महाजन यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, गुलाबभाऊ हे पाचव्यांदा निवडणूक लढवत असून देखील पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी अर्ज भरतांना दिसून आल्यामुळे ते विक्रमी मताधिक्याने निवडून येतील असा आशावाद ना. गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना शिवसेनेने जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीने उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्त आज धरणगावात अक्षरश: जनसागर उसळल्याने शहरात भव्य यातेचे स्वरूप होते. मतदारसंघातील विविध गावांमधून हजारोंच्या संख्येने समर्थकांनी वाजत-गाजत – नाचत धरणगाव गाठले.अनेक गावांमधील हजारो तरुणानी घोषणांनी जोरदार जयघोष करत दुचाकी रॅलीच्या माध्यमातून धरणगाव गाठून रॅली व सभेला हजेरी लावली.

उघड्या जीपवर पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, खा.स्मिता वाघ, भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, रॉ.कॉ. चे जिल्हाध्यक्ष संजय पवार, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, मागास वर्गीय सेनेचे जिल्हाध्यक्ष मुकुंदराव नन्नवरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पी. सी. पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्ञानेश्वर महाजन, अनिल अडकमोल, शिवसेना, रॉ.कॉ. व भाजपाचे तालुकाध्यक्ष यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी विराजमान होते. यात सहभागी झालेल्या तरूणाईच्या उत्साहाला अक्षरश: उधाण आल्याचे दिसून आले. यानंतर या रॅलीचे सभेत रूपांतर झाले. विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेसाठी दिनांक २४ रोजी गुरुपुष्यामृतच्या मुहूर्तावर सुमारे २० हजार जनसागराच्या साक्षीने आपला अर्ज दाखल केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. एम. पाटील सर यांनी केले. आभार विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील यांनी मानले. याप्रसंगी शिवसेना, भाजपा व अजित पवार गटाचे राष्ट्रवादी जिल्हा व तालुकास्तरावरील पदाधिकारी हजारोंच्या संख्येने आलेले कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. या रॅलीत महिलांची उपस्थिती देखील लक्षणीय होती.











