जळगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राज्यातील ४५ विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची नुकतीच घोषणा झाली आहे. दरम्यान जळगाव शहर मतदारसंघातून डॉ. अनुज पाटील यांची मनसेतर्फे उमेदवारी जाहीर झाली आहे.
दरम्यान बुधवारी डॉ.अनुज पाटील यांना जिल्ह्यातील मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात जोरदार स्वागत करत शुभेच्छा दिल्या. तसेच परिवारातील सदस्यांनी पेढा भरवत स्वागत केले.
जळगाव शहर मतदारसंघात आतापर्यंत भारतीय जनता पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोनच पक्षांचे उमेदवार जाहीर झाले असून महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. या मतदारसंघात भाजप, मनसे आणि महाविकास आघाडीची लढत पहायला मिळणार आहे.
डॉ. अनुज पाटील हे थेट राजकारणात सक्रिय जरी नसले, तरी त्यांची संघाशी जवळीक असल्याचे बोलले जाते. त्याचबरोबर त्यांचे वडील डॉ. के. डी. पाटील जळगाव शहराचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष होते. त्यावेळी डॉ. के. डी. पाटील हे भाजपकडून लढले होते.