जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील वडली येथील शेत शिवारामध्ये काम करीत असताना शेतकरी दांपत्यावर मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये पतीचा मृत्यू झाला असून पत्नीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विकास चूडामण पाटील (वय ५५, रा. वडली ता. जळगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान गुरुवार दि. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ११ वाजेच्या दरम्यान शेतात काम करीत असताना अचानक मधमाशांनी विकास पाटील आणि त्यांची पत्नी रत्नाबाई विकास पाटील (वय ५०) यांच्यावर हल्ला केला.
ग्रामस्थांना कळताच त्यांनी दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विकास चुडामन पाटील यांना तपासून मयत घोषित केले. तर रत्नाबाई विकास पाटील यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.