एरंडोल, (प्रतिनिधी) : तालुक्यातील भातखेडे येथील शेतकरी तुकाराम पंढरीनाथ पाटील यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. कासोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भातखेडे येथील शेतकरी तुकाराम पंढरीनाथ पाटील (वय ३९) यांच्याकडे फक्त १ एकर शेती आहे. तीदेखील कोरडवाहू आहे. तुकाराम पाटील यांनी पीककर्ज व उसनवारीचे पैसे घेतले होते व शेतात महागडे बियाणे टाकले. सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाला. परंतु, परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास वाया गेला. हे पाहून तुकाराम पाटील चिंतीत झाले होते. मात्र, पत्नी मंदाबाई यांनी त्यांना धीर दिला होता.
तरीही तूकाराम पाटील यांचा मानसिक ताण कमी झाला नाही. अखेरीस त्यांनी बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास कपाशी पिकासाठी आणलेले कीटकनाशक प्राशन केले. याबाबतची माहिती कळताच ग्रामस्थांनी तुकाराम पाटील यांना जळगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाताना रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला.
पोलिस पाटील रेखा पाटील यांनी कासोदा पोलिस स्टेशनला खबर दिली आहे. कासोदा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.