चोपडा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील अडावद येथून जवळच असलेल्या लोणी येथील ३५ वर्षीय शेतमजूर खर्डी शिवारातील एका शेतात केळी लागवड करीत असताना मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास वीज कोसळून जागीच गतप्राण झाल्याची घटना घडली.
लोणी येथील शिवाजी चैत्राम कोळी (वय ३५) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई-वडील,दोन भाऊ असा परिवार होता. (केसीएन)दि. १५ मंगळवार रोजी खर्डी शेत शिवारातील इच्छापुर शिवारातील शेतात केळी खोडाची लागवड करण्यासाठी गेलेला असताना दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक वादळ वाऱ्यासह विजेच्या गडगडाट सुरू झाला.(केपी)त्यात शिवाजी कोळी यांच्या अंगावर वीज कोसळल्याने ते जागीच गतप्राण झाले.त्यांना अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता तेथून उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे हलविण्याच्या सल्ला देण्यात आला.
उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश पाटील यांनी मृताची उत्तरीय तपासणी करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले. रात्री दहा वाजता शोकाकुल वातावरणात शिवाजी कोळी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घरातील कर्ता पुरुष नैसर्गिक आपत्तीने गतप्राण झाल्याने सर्वत्र हळ हळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.