जामनेर, (प्रतिनिधी) : कर्जाचा वाढत जाणारा डोंगर आणि पशुपालन व्यवसायात झालेले आर्थिक नुकसान झाल्यामुळे तणावात असलेल्या तरुण अल्पभूधारक शेतकऱ्याने शेतातच झाडाला गळफास लावून जीवनयात्रा संपविली. हि हृदयद्रावक घटना लोंढरी बुद्रुक ता. जामनेर येथे घडली असून याप्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जीवन ज्ञानेश्वर भागवत (वय ३८, रा. लोंढरी बु.ता.जामनेर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते सतत आर्थिक विवंचनेत होते. शेतीतून चांगले ऊत्पादन येत नसल्याने त्याला जोड व्यवसाय म्हणून त्यांनी म्हैस विकत घेऊन दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र यातही त्यांना यश आले नाही. सततच्या नुकसानीने कर्ज फेडता येत नसल्याने त्यांनी अखेर शेतातच लिंबाच्या झाडाला गळफास लावून जीवनयात्रा संपविली.
पहूर ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पहूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांच्या खबरीवरून पहूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल पाटील करीत आहेत. त्यांच्या पश्च्यात वृद्ध आई, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी व वहिनी असा परिवार आहे.