जळगाव, दि.०६ (प्रतिनिधी) : राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा विचार निर्भयता आणि नैतिकता शिकवतो. हा विचार घेऊन युवकांनी राष्ट्रबांधणीसाठी काम करावे. गांधी आणि नेहरूंच्या विचारावर देश उभा आहे . हा विचार जोपासणारी जयहिंद लोकचळवळ ही राज्यभरातील तरुणांसाठी मोठे व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन युवक आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे.
जैन हिल येथील गांधी तीर्थ येथे जयहिंद लोकचळवळ व गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाचव्या जयहिंद ग्लोबल कॉन्फरन्सच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर इंडोनेशियाचे गांधीवादी विचारवंत पद्मश्री इंद्रा उदयन, संस्थापक अध्यक्ष माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, सचिन इटकर, संकेत मुनोत, गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक उदय महाजन ,डॉ. आश्विन झाला, डॉ रवींद्र वानखेडे, दुर्गाताई तांबे, शैलेंद्र खडके आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, सुदृढ निरोगी समाज बनवण्यासाठी १९९८ मध्ये जय हिंद लोकचळवळीची स्थापना झाली. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, राज्याचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, सौ दुर्गाताई तांबे यांनी माणसांना जोडण्याचे संस्कार दिले यातून मी युवकांना जोडत गेलो. आणि आज ही चळवळ राज्यभर पोहोचली आहे. समाजामध्ये अंधश्रद्धा, जातीभेद, अस्वच्छता रूढी परंपरा यांचे मोठे प्राबल्य असून या सर्वांच्या विरुद्ध लढण्यासाठी रचनात्मक विचार जय हिंद च्या माध्यमातून दिले जात आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा नैतिकतेचा विचार माणसाला निर्भय बनवतो. गांधी व नेहरूंच्या विचारावर हा देश उभा असून गांधींनी भारताला भारत पण दिले.
छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा स्वराज्य व रयतेच्या कल्याणाचा एकच विचार असून सर्वधर्मसमभाव जोपासत शेतकरी व गोरगरिबांच्या कल्याणाचे राज्य निर्माण व्हावे हा विचार त्यांचा आहे. या विचारातून या तरुणांनी काम असे आव्हान करताना विविध कलागुण व करिअरच्या दृष्टीने राज्यभरातील युवकांसाठी जय हिंद लोकचळवळ हे मोठे आश्वासक व्यासपीठ असल्याचे त्यांनी सांगितले.
तर पद्मश्री इंद्रा उदय म्हणाले की, गांधी विचार सर्व दूर पोहोचवणारी ही जय हिंद लोक चळवळ असून देश प्रेमाने भारवलेले तरुण येथून निर्माण होत आहेत. भारत व इंडोनेशिया मधील संबंध अधिक दृढ करण्याचे काम जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जैन उद्योग समूहाने उभारले गांधी तीर्थ हे सर्वांसाठी ऊर्जा देणारे प्रेरणास्थळ असल्याचे ते म्हणाले. यावेळी प्रमोद चुंचूवार यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील ३०० युवक व युवती तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार नाशिक बुलढाणा, अहमदनगर , औरंगाबाद जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.