रावेर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिंप्री येथील युवक हा त्याच्या मोटारसायकलने (एमएच १९ – ईबी ६७५०) रावेरहून गावी परत जात असताना अज्ञात वाहनचालकाने त्यास जबर धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ३० सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. याबाबत ३ ऑक्टोबर रोजी रावेर पोलिसात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवम ऊर्फ शिवा रमेश जाधव (वय ३०) असे मयत तरुणाचे नाव आहे. पिंप्री येथील युवक शिवम उर्फ शिवा रमेश जाधव हा रावेरहून मोटारसायकलने घरी जात असताना, त्यास अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. घटनास्थळावरून वाहनचालक पसार झाला. शिवम गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाला.
रावेर पोलीस स्टेशनला दिनांक ३ रोजी विनोद लालचंद जाधव यांनी रावेर पोलिसात फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. राजेंद्र राठोड, पो.कॉ. गोपाळ ठाकूर पुढील तपास करीत आहेत.