भुसावळ, (प्रतिनिधी) : शहरातील रेल्वे शाळेच्या परिसरात लोखंडी तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या तीन संशयित आरोपींवर भुसावळ शहर पोलीसांनी रविवारी २९ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता कारवाई करत ताब्यात घेतले आहे. याबाबत सोमवारी ३० सप्टेंबर रोजी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील रेल्वे शाळेच्या परिसरात संशयित आरोपी दिपक रमेश म्याद्रे (वय ४०), पंकज रेवाराम कहार (वय १९) आणि एक अल्पवयीन मुलगा असे तीन जण दुचाकीवर हातात लोखंडी तलवार घेवून दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांना मिळाली.
त्यानुसार पथकाने रविवारी दि. २९ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता तिघांवर कारवाई करत तिच्यांकडून लोखंडी तलवार आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. तिघांना पोलीसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी सोमवारी ३० सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ पाटील करीत आहे.