जळगाव, दि.२६ (प्रतिनीधी) : केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित ललित कला संवर्धिनीच्या माध्यमातून भुलाबाई महोत्सव या नृत्यगीतांची स्पर्धेचे आयोजन रविवार दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे सकाळी १० ते ६ या वेळात आयोजित करण्यात आला आहे. या संदर्भात गुरूवारी पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली.
यंदा या महोत्सवाचे २३ वे वर्ष साजरे होत असून शहरी व ग्रामीण स्तरावर व तीन गटात स्पर्धा होत आहे. प्रत्येक गटात १२ ते १५ मुलींची संख्या असते. यात भुलाबाईच्या गाण्यांना अग्रक्रम देण्यात येतो मात्र सध्याच्या चालू घडामोडींवर समाजोपयोगी संदेशाची पेरणी महिला करतात. अशा गाण्यांना प्राधान्य देवून भुलाबाई महोत्सव हा समाजप्रबोधनाचे एक व्यासपीठ म्हणून प्रस्थापित करण्यात प्रतिष्ठानला यश प्राप्त झाले आहे. भुलाबाईची महती अधिक महिलांपर्यत पोहचणे व ग्रामीण भागातील महिलांना सहभागी होता यावे या दृष्टिने यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील चोपडा, जामनेर, अमळनेर, पारोळा, चाळीसगाव व भुसावळ येथे तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यात विजेत्यांच्या प्रत्येक गटास प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात येणार असून सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यंदाच्या भुलाबाई महोत्सव प्रमुख म्हणुन साधना दामले व सहप्रमुख म्हणून देवयानी कोल्हे यांची निवड झाली आहे. भुलाबाई महोत्सवास प्रत्यक्ष सुरुवात होण्यापूर्वी मायादेवी मंदिर ते छ. संभाजीराजे नाट्यगृह पर्यंत भुलाबाईची पालखी काढण्यात येणार आहे. यामध्ये मुलींचे ढोल पथक, लेझिम पथक, सामाजिक समतेचे संदेश देणारे फलक असतील. अधिकाअधिक महिलांनी व मुलीनी कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन आयोजकांनी केले आहे.