जळगाव, (प्रतिनिधी) : माहेरी श्राद्धाच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या मुलीला परताना आईने सोने घेण्यासाठी २० हजार रुपये दिले ; मात्र घरी पोहोचण्यापूर्वीच या रोकडसह २० हजार रुपयांचे झुमके चोरट्यांनी लांबविले. ही घटना १९ सप्टेंबर रोजी रात्री इच्छादेवी चौक ते बी.जे. मार्केटदरम्यान घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
रेणुका नगरमधील रहिवासी नयना सचिन चौधरी (वय २७) या गुरुवारी दि. १९ रोजी शिरसोली येथे आईच्या घरी श्राद्धचा कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या आईने सोने घेण्यासाठी २० हजार रुपये दिले. या रकमेसह पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके पर्समध्ये ठेवले. सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास त्या एका रिक्षाने येण्यासाठी निघाल्या. (केपी) या रिक्षात अगोदरच दोन महिलांसह एक पुरुष बसलेला होता. इच्छादेवी चौकापर्यंत नयना यांची पर्स त्यांच्याजवळच होती, त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाजवळ रिक्षातील एक पुरुष व एक महिला उतरले.
पुढे बी.जे. मार्केटजवळ उतरल्यानंतर नयना यांनी रिक्षाभाडे देण्यासाठी पर्स पाहिली असता ती चोरीला गेल्याचे लक्षात आले. रिक्षातच ही पर्स चोरीला गेल्याची खात्री झाल्याने(केपी) या प्रकरणी त्यांनी शुक्रवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल गणेश शिरसाळे करीत आहेत.